पुणे Amol Kolhe VS Shivajirao Adhalrao Patil : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मोठ्या संख्येनं शिवप्रेमी दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा शासकीय सोहळा पार पडला. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह लाखो शिवभक्त शिवनेरी गडावर हजर होते. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिरूरमधील कामाबाबत वक्तव्य केलं.
काय म्हणाले अमोल कोल्हे? : शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड केलीय. त्यामुळं शिरूर लोकसभेसाठी त्यांची दावेदारी संपली, अशा आशयाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अस असतानाच "मी शिरूर मतदार संघासाठी इच्छूक आहे," असं विधान आढळराव पाटलांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता अमोल कोल्हे म्हणाले की,"आढळराव पाटलांना लोकसभेसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. लोकशाही असल्यानं कुणीतरी हरणार आहे. तर कुणीतरी जिंकणार आबे. माझं त्यांना खूलं आव्हान आहे की, त्यांनी समोरासमोर चर्चा करावी. माझी 5 वर्षांतील कामगिरी आणि त्यांची 15 वर्षातील कामगिरी याचा समोरासमोर लेखाजोखा मांडण्यात यावा", असं ओपन चॅलेंज त्यांनी केलंय.