मुंबईSharad Pawar On CM Eknath Shinde : महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या दुष्काळातील परिस्थितीबाबत उपाययोजना करण्याची कोणतीही भूमिका घेतली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. पाठपुरावा करून देखील राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळं जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावा लागेल, असा राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून इशारा पवार यांनी दिलाय.
जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. राज्यातील जनतेचे जीवन दुष्काळामुळं अक्षरशः विस्कळीत झालंय. पाणीटंचाईचे मोठं संकट उभे राहिलं असून जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र, राज्यातील या भीषण परिस्थितीकडं लक्ष वेधून देखील राज्य सरकारकडून कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अशाच प्रकारची परिस्थिती जर राज्यात कायम राहिली आणि राज्य सरकारकडून तातडीनं कोणतेही पावले उचलले नाही तर राज्यातील जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावा लागेल, असा इशारा शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून दिलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाकरिता योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा देखील शरद पवार यांनी व्यक्त केलीय.
पत्रात काय आहे?: खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. 24 मे रोजी आपण पत्रकार परिषद घेऊन राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारचं लक्ष वेधलं होतं. त्यासोबतच आपण राज्य सरकारला सहकार्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रित सामोरे जाण्याची स्पष्ट केलं होतं. आपण देखील आदल्या दिवशी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ परतीचा आढावा घेतला. मात्र याला पालकमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री गैरहजर होते. याची आपण दखल घेतली असेलच. मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार अंग झटकून कामाला लागलं नसल्याचं आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचं पवार यांनी म्हटलंय.