पुणे Sharad Pawar MLA Return : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी आपण किती जागा लढवायच्या याची चाचपणी सुरू केलीय. महायुती आणि महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीत फुटीनंतर शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार पुन्हा परत येणार असल्याची चर्चा सुरू असून, आता याबाबत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.
शरद पवार म्हणाले, "तसं काही नसून मतदान करणाऱ्या मतदारांकडून आम्हाला पत्रं येत असतात. लोकसभेत त्या आमदारांच्या विरोधात आम्ही तुम्हाला मतदान केल्याचं मतदार या पत्रांद्वारे सांगतात. त्यामुळं आता त्या आमदारांचा पक्षात पुन्हा समावेश झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदान करताना विचार करावा लागेल, असं मतदार आम्हाला सांगतात.
सत्ताबदल करणार :यावेळी शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारलं असता ते म्हणाले, "आम्ही सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार सर्वेक्षण करत असून, मेरिटनुसार जो उमेदवार विजयी होईल, त्यालाच उमेदवारी देणार आहोत. आमचं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे राज्यात आम्हाला सत्ताबदल करून आमचं सरकार आणायचं आहे."
'त्याच' पक्षाला मुख्यमंत्रिपद : मुख्यमंत्रिपदाबाबत पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांचीही अदलाबदल केली जाईल. ज्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येतील त्याच पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्यात येईल." विधानसभेला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे आमचं चिन्ह असणार असल्याचं यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
- विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून निर्णयांचा पाऊस; मंत्रिमंडळानं घेतले 38 महत्त्वाचे निर्णय - Maharashtra Cabinet Decision
- ‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." - Supriya Sule
- आमदार नितेश राणेंच्या फेसबुक लाईव्हवर आक्षेपार्ह कमेंट्स; गुन्हा दाखल होणार - NITESH RANE NEWS