मुंबई NCP SCP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या यादीत सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. आतापर्यंत या पक्षाकडून एकूण नऊ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
नऊ जागांसाठी तीन याद्या : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या आहेत. त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केलीय. अशाप्रकारे आतापर्यंत तीन याद्या जाहीर करत पक्षानं नऊ उमेदवारांची घोषणा केलीय. तर माढा लोकसभेचा तिढा सुटलेला नाही. माढा लोकसभेत महायुतीनं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळं आता शरद पवार आपल्या कोणत्या शिलेदाराला मैदानात उतरवतात. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
15 मार्चला दाखल करणार उमेदवारी अर्ज : शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसंच माथाडी नेते म्हणुनही त्यांची ओळख आहे. यामुळं महायुतीच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय. सोमवार 15 मार्चला ते शक्तीप्रदर्शन करत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीनं आतापर्यंत सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा सस्पेन्स ठेवला होता. एकीकडं महायुतीनं मेळावे सुरू करताच शरद पवार यांन देखील मुंबईत आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढण्यास पुन्हा नकार दिलाय. विशेष म्हणजे कोण लढणारं आहे का बघा. नाही तर मी आहेच, असं जाहीर वक्तव्य आमदार शशिकांत शिंदेंनी रविवारी केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय.