पुणे Sharad Pawar Criticized PM Modi : जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. या टीकेलाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच ज्या देशात एक कुटुंब आपल्या तीन-तीन पिढ्या देशाच्या हितासाठी देतं, अशा लोकांवर मोदी टीका करत असल्याचंही पवार म्हणाले. ते पुण्यातील वडगाव शेरी येथील सभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधी यांनी या देशासाठी काय केलं नाही? तरी त्यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधींनी आधुनिकतेचा विचार देशासमोर मांडला. त्यांची हत्या झाली. या एका घरानं किती त्याग करायचा? आजच्या काळात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या लोकांचं देशाच्या स्वातंत्र्यात योगदान नाही का? ज्या कुटुंबातील तीन-तीन पिढ्या देशाच्या हितासाठी काम करतात, अशा लोकांवर मोदी टीका करतात. खरं तर त्यांना वाटलं पाहिजे की ही सर्व साधीसुधी माणसं नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केलं?"
मोदींच्या सभेविषयी काय म्हणाले? :पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द करण्यात आली. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, "मला चिंता होती की पावसामुळं पुण्यातील सभा होणार की नाही. पंतप्रधान मोदी पुण्यात येणार होते पण त्यांचा दौरा पावसामुळं रद्द झाला. मी बापू पठारे यांना सभेविषयी विचारलं तर ते म्हणाले की पंतप्रधान येऊ अगर न येऊ आपली सभा होणार आणि मोठ्या संख्येनं होणार आणि मला खरंच आनंद आहे की प्रचंड संखेनं आज लोक इथं उपस्थित आहे."
सुनील टिंगरेंचा पवारांनी घेतला समाचार : वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव आता पोर्शेकार प्रकरणात आलंय. त्यावरुन शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच पुण्याची ओळख आता कोयता गँग आणि ड्रग्जसाठी होत असल्याबद्दलही पवारांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “एका बिल्डरच्या मुलानं भरधाव गाडी चालवत दोघांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावानं यानं मतं मागितली. लोकांनी श्रद्धेनं मतं दिली. त्याचं तुम्ही असं उत्तरदायित्व केलं? अशा आमदाराला दमदार म्हणतात? लाज वाटली पाहिजे.”
हेही वाचा -
- वडगाव शेरी विधानसभेसाठी बाप-लेकात चुरस; कोणाला मिळणार उमेदवारी? - Maharashtra Assembly Election 2024
- "राज्यातील परिस्थिती दोन महिन्यात बदलेल"; शरद पवारांचं सूचक वक्तव्य - Sharad Pawar
- साताऱ्यात दिसलं शरद पवारांचं 'जेम्स बॉन्ड' कनेक्शन; 'व्हीआयपी' नंबरच्या मर्सिडीजनं वेधलं लक्ष - Sharad Pawar Car Satara Visit