सातारा : तिसऱ्यांदा आमदार झालो असताना महाविकास आघाडीच्या काळात मला राज्यमंत्रीपद आणि पहिल्यांदा आमदार झालेल्या पक्षप्रमुखांच्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना लगावला. पक्षासाठी मेहनत घेतलेल्या एकनाथ शिंदेसारख्या शिवसैनिकाला नेतृत्वाने मुख्यमंत्री केले नाही. त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यानेच आम्ही सर्वांनी उठाव केल्याचंही देसाईंनी सांगून टाकलं.
शिवसेना बुडवण्याचा घाट घातल्यानेच उठाव : उद्धव ठाकरेंची सभा झालेल्या पाटण तालुक्यातील मल्हारपेठमध्येच आमदार शंभूराज देसाईंनी सोमवारी सांगता सभा घेत सर्व आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. देसाई म्हणाले की, शिवसेनेची काँग्रेस होऊ द्यायची नाही, असं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं होतं. त्याच विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत. मात्र, पक्षप्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी उभी राहिलेली, अनेकांच्या कष्टातून वाढलेली ही संघटना काँग्रेसबरोबर आघाडी करून बुडवण्याचा घाट घातला. म्हणून आम्ही उठाव केला.
माझ्यासारख्या शिवसैनिकावर अन्याय : पहिल्यांदा निवडून आलेल्या पक्षप्रमुखांच्या मुलाला कॅबिनेट मंत्री केलं. हा माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर अन्याय होता. संधी आली तेव्हा पक्षासाठी मेहनत घेतलेल्या शिवसैनिकाला नेतृत्वाने मुख्यमंत्री केलं नाही. सरकारमध्ये असताना आमचं ऐकलं जात नव्हत. त्यामुळं उठाव करावा लागल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितलं.
आमचा उठाव कळला नाही, हे त्यांचं अपयश :मुख्यमंत्री असलेल्या तेव्हाच्या पक्षप्रमुखांना आमचा उठाव कळला नाही, हे त्यांचे अपयश असल्याचा टोला शंभूराज देसाईंनी लगावला. आमचा उठाव हा शिवसेना वाचवण्यासाठी, आणि महाराष्ट्राच्या हितासाठी होता, असंही शंभूराज देसाईंनी यावेळी स्पष्ट केलं. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणानुबंध होते. त्या प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे यांनी मला सन्मानाने शिवसेनेत घेतले. तेव्हापासून शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतल्याचंही शंभूराज देसाईनी सांगितलं.
- हेही वाचा -
- मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची शेवटची पत्रकार परिषद; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
- "बारामतीचं नाव घेतलं की, लोक आणखी एक नाव घेतात ते म्हणजे..."; पाहा काय म्हणाले शरद पवार
- डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध उद्धव सेनेमध्ये होणार चुरशीची लढत