मुंबई Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्पातील मतदान जवळ येत आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीत तीन ते चार जागांचा प्रश्न सुटलेला नाही. तर महायुतीत आठ-नऊ जागांचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन एकीकडं काँग्रेसचा दावा कायम आहे. तोच दुसरीकडं शिवसेना (ठाकरे गट) या ठिकाणी उमेदवारी जाहीर करुन प्रचारालाही सुरुवात केली आहे. आजपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तीन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी सांगलीच्या जागेवरुन संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय.
काँग्रेस नेतृत्वानं कार्यकर्त्यांची समजूत काढावी : सांगलीची जागी ही मागील अनेक वर्षापासून काँग्रेसकडे होती. मात्र मविआत ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं सांगलीतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "कोल्हापूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ या दोन जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या आहेत. तिथं आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता. तिथं मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी, आमच्या पक्षाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत आम्ही काढली. सांगलीच्या जागेवरुन जर काँग्रेसमध्ये कोणी नाराज असेल किंवा कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांची समजूत काँग्रेस नेतृत्त्वानं काढावी. मला खात्री आहे, काँग्रेसचं नेतृत्व सांगलीत आणि राज्यात कोणी नाराज असतील तर त्यांची नक्कीच ते समजूत काढतील. त्यांचं ते कर्तव्य आहे."