मुंबई/नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोग मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले, "आम्हीसुद्धा कित्येक दिवसांपासून निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात, याच्या प्रतिक्षेत होतो. महाराष्ट्रसारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणूक होत आहेत. या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगानं निष्पक्षपणाने घेतल्या पाहिजेत. कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये. अकारण विरोधकांना त्रास देण्याचं आणि विरोधकांना छळण्याचे काम करू नये. "
10 ते 15 करोड रुपये वाटले-खासदार संजय राऊत म्हणाले, "निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागणार आहे. म्हणून सत्ताधारी पक्षानं काही मतदारसंघात एकेका उमेदवाराला दहा ते पंधरा कोटी रुपयांचे वाटप केले आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे. कारण, आचारसंहिता लागल्यानंतर पैशाचे वाटप करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आधीच हे पैशाचे वाटप केले आहे. याबाबत याची माहिती मी निवडणूक आयोगाला देणार आहे." पुढे खासदार राऊत म्हणाले, "किंबहुना पैशाचं आधी वाटप व्हावे. त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील. अशी तर भूमिका निवडणूक आयोगाची नाही ना? अशी शंका आमच्या मनात येते. आयोगाने निष्पक्षपणानं निवडणुका घेतल्या पाहिजेत, एवढी आमची माफक अपेक्षा आहे," असे संजय राऊत म्हणाले.
निवडणूक आयोगाकडून कारवाई होत नाही- खासदार राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. खासदार राऊत म्हणाले,"अमोल कीर्तीकर यांचा लोकसभा निवडणुकीत केवळ 48 मतांनी पराभव झाला. हा पराभव करण्यात निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना मदत केला. पैसे वाटप किंवा अनेक पुरावे आम्ही आयोगाला दिले. मुख्यमंत्री पैशाच्या बॅगा घेऊन नाशिकला गेले होते. याचे मी फुटेज दिले. पण, याच्यावर काही झालं नाही. लोकसभा निवडणुकीत पैशाचे वारेमाप वाटप झाले. उत्तर प्रदेशमध्येही असे अनेक प्रकार घडले. पण निवडणूक आयोगानं कोणतीही यावर कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या माध्यमातून निवडणूक आयोगापर्यंत ही माहिती देणार आहोत. बघू, या आता यावर निवडणूक आयोग काय करते," अशी टीका संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केली.
सध्या नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे फिरून झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काही काम नाही. त्यांना महाराष्ट्रात लक्ष द्यायला भरपूर वेळ आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे मला वाटत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होतील- संजय राऊत, शिवसेना ठाकरे खासदार
सत्ताधाऱ्यांच्या चर्चेतूनच तारखा जाहीर-पोस्टल वोटिंगचा घोळ दिसून येत आहे, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला खासदार राऊत म्हणाले, "अनेक ठिकाणी पोस्टल वोटिंगमुळेच भाजपा जिंकले आहे. हरियाणामध्येही हाच प्रकार पाहायला मिळाला. जिथे थोड्याफार प्रमाणात पराभव होतोय, असं वाटतंय तिथे पोस्टल मतांचा आधार घेऊन निवडणुकीचा निकाल आपल्याला हवा तसा लावतात. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तारखा ह्या लांबणीवर गेल्या आहेत. निवडणुकीच्या तारख्या कशा पाहिजेत? या सत्ताधाऱ्यांच्या चर्चेतूनच जाहीर होतील. कारण आचारसंहितेमुळे पैशाचं वाटप करता येणार नाही. त्यांना वेळ मिळावा म्हणून तारखा लांबवल्या आहेत," असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
राज्यपाल घटनाबाह्य काम करतायेत...राज्यपाल नियुक्त आमदारांचा आज शपथविधी होतोय, यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, "हे घटनाबाह्य सरकार आहे. घटनाबाह्य काम करत आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. आज दुपारपासून आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वीच हे राज्यपाल नियुक्त सदस्यांना शपथ देणार आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनं हे संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात केलं जातंय. आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात यादी पाठवली होती. त्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला नव्हता. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना घाईघाईनं राज्यपाल शपथविधी कशी काय देऊ शकतात? हे अत्यंत लोकशाहीविरोधी सरकार आहे. हे लोकशाही विरोधी कृत्य करत आहे," घणाघात संजय राऊत यांनी केला. "घटनाबाह्य सरकार राज्यपालांना हाताशी धरून घटनाबाह्य काम करत आहेत," अशी टीका संजय राऊतांनी केली.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा गरजेचं-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत एकसूत्रता आणि एकवाक्यता राहण्यासाठी आणि लोकांना विश्वास वाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे गरजेचे असल्याचं संजय राऊत म्हणाले. खासदार राऊत म्हणाले, "आम्ही 25 वर्ष भाजपासोबत युतीत होतो. पण, भाजपासोबतचा अनुभव फार वाईट होता. आमचे सूत्र ठरले होते की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे. पण आमचे आमदार निवडून येऊ नये, म्हणून भाजपानं आमच्या आमदारांना पाडले. भाजपानं पाडापाडीचे राजकारण केले. त्यामुळे आमचे अनेक निवडून येणारे आमदार त्यावेळी निवडून येऊ शकले नाहीत. परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्यात समन्वय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षांमधून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर मतदारांना एक विश्वास वाटतो. त्यावर मतदान होते."
हेही वाचा-
- राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी नाही!
- महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा वाजणार बिगुल, दुपारी निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक होणार जाहीर
- कसब्यात वारं कुणाचं? काँग्रेस विरुद्ध भाजपा लढाईत कोण मारणार बाजी? जाणून घ्या राजकीय समीकरणे