मुंबई Sanjay Raut : ऐन लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलीय. आपण तुरुंगातून सरकार चालवणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर भाजपानं जेलमधून गँगस्टर काम करतात, अशी टीका केली. या टीकेवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? ते भांग पिऊन बोलत आहेत. आज होळीदेखील आहे, असं म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय.
लोकशाहीचा रंग उधळला जाणार : खासदार संजय राऊत म्हणाले की, "देशात लोकशाहीचा रंग उधळला जाणार आहे. देशात अनेकदा हुकूमशाही एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, देशातील लोकांनी लोकशाहीचं रक्षण केलं. आतादेखील प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. त्याचप्रमाणे अनेक विरोधकांना अटक केली. तर अनेक जणांवर अटकेची टांगती तलवार आहे. जनता फार सहन करणार नाही. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानं दिल्लीसह देशात लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकार जरी डोळे मिटून बसलं असलं तरी त्यांना माहित आहे की, सध्या देशात काय सुरू आहे. जगात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरली. हुकुमशाहांना एकतर लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा हुकूमशाहांना देश सोडून पळून जावं लागलंय. आपल्या देशातदेखील आता ती वेळ आलीय.
भाजपा मोठा पक्ष नाही : भाजपानं कंगना राणौतला लोकसभेची उमेदवारी दिलीय. यावर बोलताना राऊत म्हणाले," भारतात प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कंगना राणौतचे विचार भारतीय जनता पार्टी सोबत जुळूवन येतात. त्यामुळं ते उमेदवारी देऊ शकतात. परंतु, कोणाला निवडून द्यायचं हे लोकांच्या हातात आहे. भाजपा हा कधीही मोठा पक्ष नव्हता. एखादा दरोडेखोर चोऱ्या-माऱ्या करुन आपली संपत्ती वाढवून श्रीमंत असल्याचं म्हणतो. तसं भाजपाचं आहे. दुसऱ्याच्या श्रीमंतीवर दरोडा टाकायचा. याला काही श्रीमंती बोलत नाहीत. दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे आणि लहान पक्षांना विकत घ्यायचे. याला संपत्ती बोलत नाहीत."
ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर करणार : महादेव जानकर हे महायुती गेले आहेत. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " हे असेच लोक आहेत. ज्यांना विचारधारा नाही. जिकडे खायला मिळेल तिकडे पळतात. महादेव जानकर यांची महाविकास आघाडीमध्येही येण्याची तयारी होती. अचानक जाऊन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटलेले आहेत. आम्ही उद्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करणार आहोत. त्यामध्ये 15 ते 16 जणांची यादी जाहीर करणार आहोत.
- कंस मामालादेखील तिकीट देतील : "भाजपा आता रामायण मालिकेतील पात्र साकारणाऱ्या सर्वांनाच तिकीट देऊ शकतात. तर ते आता रावणाला देखील आणि बाकीच्यांना देखील उमेदवारी देऊ शकतात. भाजपा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला पक्ष आहे. यात सगळे भ्रष्टाचारीच येणार आहेत," असं म्हणत भाजपाला त्यांनी टोला लगावलाय.
हेही वाचा :
- "शकुनी मामामुळंच 'वंचित'...."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Nitesh Rane On Sanjay Raut
- संविधानावर हल्ला करणाऱ्यांचे होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य-संजय राऊत - SANJAY RAUT NEWS