मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं बघायला मिळतंय. मात्र, असं असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलंय. “देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही", असं संजय राऊत म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : संजय राऊत यांनी आज (27 ऑक्टोबर) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राजकीय नेत्यांवर करण्यात येणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांविषयी विचारण्यात आलं असता राऊत म्हणाले की, "राजकारणात विचारांची लढाई विचारानं व्हावी. कोणीही वैयक्तिक दुश्मनी करू नये. महाराष्ट्रात हा वारसा पूर्वीपासून सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या हातात सत्ता गेल्यापासून कौटुंबिक दुश्मनी वाढली. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य फक्त राजकारणापुरतंच मर्यादित होतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत", असंही राऊत म्हणाले.