बंधूंना मिळालेल्या ED नोटीसीवरुन संजय राऊत कडाडले, नेमकं काय म्हणाले? वाचा मुंबई Sandeep Raut ED Summons :लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. असं असतानाच राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या पाठीमागं ईडीची पिडा लागल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना देखील ईडीनं समन्स बजावलं आहे. ईडीनं कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. यानुसार संदीप राऊतांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत :मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, "ते काय कोणालाही नोटीस काढतात. फक्त 8000 कोटींच्या ॲम्बुलन्स घोटाळ्यासाठी ते नोटीस काढणार नाहीत. 500 कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणासाठी ते नोटीस काढणार नाहीत. गिरणा सहकारी कारखाना 89 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगसाठी ते नोटीस काढणार नाहीत. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्या प्रकरणी ते नोटीस काढणार नाहीत. हसन मुश्रीफांच्या आलेल्या नोटीस ते जाळून टाकतील. प्रफुल्ल पटेल, बिस्वा सरमा यांच्यासाठी देखील नोटीस निघणार नाही."
नोटीस काढण्याचं नवीन तंत्र सुरू : पुढं ते म्हणाले की, "या देशात आणि महाराष्ट्रात जे विरोधी पक्षांमध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढतायत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय. रोहित पवारांची 12 तास चौकशी करण्यात आली. आज किशोरी पेडणेकर यांना बोलावलं आहे. रवींद्र वायकर यांना नोटीस काढली आहे. हे सगळे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत. दोन लाखांचा व्यवहार कुठंय? पाच लाखाचा व्यवहार कुठंय? त्याच्या नोटीस आहेत. पण, यांची पोरं बाळं दहा पन्नास हजार कोटींचे व्यवहार करून देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावर कोणाचंच लक्ष नाही."
फडणवीसांचं राज्य आहे की अफजल खानचं : "मला माहिती आहे संदीप राऊतांचं हॉटेल आहे. त्यावेळी खिचडीसाठी त्यांचं हॉटेल वापरण्यात आलं आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली, याविषयीची नोटीस पाठवली आहे. हे हास्यास्पद असून हा निव्वळ मूर्खपणा आहे. आम्ही ठामपणे उभं राहू, हवं ते करा. मुगलाई चालू आहे का? देशात मोदींचं राज्य आहे की औरंगजेबांच? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजल खानचं? की निजामशाही आली आहे? आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही. दोन पाच लाखासाठी व्यवहारासाठी तुम्ही आम्हाला नोटीसा पाठवता? तुम्ही काय चिंचोके खाता का?" असा खोचक सवालही यावेळी संजय राऊतांनी केला.
हेही वाचा -
- ईडीच्या फेऱ्यात मविआ नेते; रोहित पवार यांच्यानंतर संदीप राऊतांना समन्स तर किशोरी पेडणेकरांची आज होणार चौकशी
- खिचडी घोटाळा प्रकरण; संजय राऊतांची मुलगी आणि धाकटा भाऊ EOWच्या रडारवर
- Sandeep Raut : ...म्हणून त्रास दिला जातोय, संदीप राऊतांची साडेचार तास चौकशी