मुंबई - "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. भाजपाला पराभवाची भीती आहे. त्यामुळेच निवडणूक निकाल आणि त्यानंतर सरकार स्थापनेसाठी खूप कमी कालावधी आहे,"असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.
मर्द असाल तर- खासदार संजय राऊत म्हणाले, "राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. भाजपा पराभवाच्या छायेत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी हाताशी धरुन मतदार यादीत घोटाळा सुरू आहे. मतदार यादीतील नावं गायब होत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. किमान 150 मतदारसंघात प्रत्येकी 10 हजार नावं काढायची आणि त्याठिकाणी बोगस नाव टाकायची हे सुरू आहे. लोकशाहीतील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. पण, आम्ही विधानसभेत यांचा नक्कीच पराभव करणार आहोत. आम्ही लोकांपर्यंत पोहचू जागृत करणार आहोत. निवडणूक आयोगाच्या हे निदर्शनास आणून देऊ."
चंद्रशेखर बावनकुळे घोटाळ्याचे सूत्रधार- खासदार राऊत म्हणाले, " बोगस मतदारांच्या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत. यांनी याबाबत नागपूरला विशेष अधिवेशन घेतलं आहे. मतदारांची नावं कशी काढायची? बोगस आपली नावे कशी टाकायची? याचं प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिलं आहे." मर्द असाल तर लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरी जा" असं आव्हानं संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिलं. " मतदार यादीतील घोटाळा हा हरियाणा आणि झारखंड येथे केला. आता महाराष्ट्रात करु पाहत आहेत. पण हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू," असा इशारा राऊतांनी भाजप नेत्यांना दिला. अमित शाह हे घाणेरडं राजकारण करीत आहेत. अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असंही शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणालेत.