मुंबई : मतदानाचा दिवस आता हळूहळू जवळ येऊ लागलाय. अशातच 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सोमवारी कोणाविरोधात कोणाची लढत होणार याचं चित्र स्पष्ट होईल. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडोबांचं बंड शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर, दुसरीकडं महायुती आणि मनसेमधील माहीमच्या जागेवरील चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत.
एका बाजूला सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातंय. तर, दुसरीकडं सदा सरवणकर यांनी यातील पेच अधिकच वाढवलाय. मनसेनं महायुती विरोधातील उमेदवार मागे घ्यावेत, तरच मी अर्ज मागे घेईल, अशी सदा सरवणकर यांनी अट घातल्यानं हा पेच अधिकच वाढलाय.
राज ठाकरेंची घेणार भेट : माहीममधील जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चांना आमदार सदा सरवणकर यांनी पूर्णविराम दिलाय. शनिवारी (2 नोव्हेंबर) दिलेल्या एका मुलाखतीत माहीममधील जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण उमेदवार मागे घेणार नसल्याचे संकेत दिले होते. अशातच आज (3 नोव्हेंबर) सदा सरवणकर यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय.