पुणे Rohit Pawar Criticized Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघ यंदा चांगलाच चर्चेत राहिलाय. 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार असून आज प्रचारासाठीचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवारांच्या शेवटच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी बारामतीत थेट लढत आहे. राष्ट्रवादी फुटल्यामुळं यंदा बारामतीत दोन्ही पवारांच्या सभा होणार असून या सभांकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान, असं असतानाच आता या सभेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय.
काय म्हणाले रोहित पवार? : "गेल्या पन्नास वर्षांत शरद पवार बारामतीतील ज्या ग्राउंडवर सांगता सभा घ्यायचे ते ग्राउंड यावर्षी अजित पवार गटानं अगोदरच घेतले. दुसऱ्या ग्राउंडवर सभा घ्यावी लागत आहे. मात्र, ग्राउंड जरी नवीन असलं, तरी नेता आणि विचार तोच आहे," असं रोहित पवार म्हणालेत. "आमचा पक्ष चोरीला गेला. आमचं चिन्हं चोरीला गेलं. राजकीय यंत्रणा चोरीला गेली. तसंच आता आमचं ग्राउंड सुद्धा चोरीला गेलंय. आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला ते देण्यात आलं नाही," रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.