बारामतीतील सर्व्हेवरुन रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली पुणे Baramati Lok Sabha Constituency : काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र, तरीही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटासह महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय.
काय म्हणाले रोहित पवार? : यावेळी बोलत असताना , "बारामती लोकसभा मतदार संघासाठी अजित पवार गटाकडून नऊ सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये अजित पवार यांचे उमेदवार मागे असल्याचं दिसत आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या सर्व्हेमध्ये पुढं आहेत. त्यामुळं ते आता पुन्हा एकदा दहावा सर्व्हे करतील आणि मगच आपला उमेदवार जाहीर करतील", असा टोला रोहित पवार यांनी लगावला. तसंच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विजय शिवतारेंबद्दल काय म्हणाले? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बदला घ्यायचा म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून लोकसभा लढवणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध शिवतारे वाद पाहायला मिळाला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता शिवतारे यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "विजय शिवतारे यांनी अगोदर अजित पवारांवर टीका केली होती. मात्र, आता त्यांनी यू टर्न घेतलाय. नेत्यांना भेटल्यावर भूमिका बदलणार असाल तर हे लोकांना न आवडणारं आहे. तसंच तुम्ही अजित पवारांविरोधात बोललेले व्हिडिओ लोकांपर्यंत गेले आहेत. ते आता डिलीट कसे करणार?", असा खोचक सवालही त्यांनी केला.
हेही वाचा -
- विजय शिवतारे नरमले; अजित पवारांच्या वादावर म्हणाले, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो! - Vijay Shivtare on backfoot
- फक्त बारामती नाही तर चारही मतदारसंघात साथ द्या; पैलवानांच्या मेळाव्यात अजित पवारांचं आवाहन - Wrestlers Gathering
- बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार, महादेव जानकर तिथून निवडणूक लढवणार नाहीत : अमोल मिटकरी - Lok Sabha Election 2024