मुंबई Lok Sabha Election 2024 :कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी (4 मे) प्रचार सभा घेतली. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. त्यामुळं ही लढत चुरशीची होणार आहे. तर शनिवारी राज ठाकरेंनी केलेलं भाषण, हे नारायण राणेंसाठी कितपत प्रभावी ठरेल? लोकांचं मत परिवर्तन होईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मतदारांवर प्रभाव पडेल? : एखादा विषय पद्धतशीरपणे मांडणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं यात राज ठाकरेंचा हातखंडा आहे, असं लोक सांगतात. त्यांच्या प्रभावी भाषणशैलीमुळं त्यांच्या सभेला नेहमीच मोठी गर्दी बघायला मिळते. मात्र, आतापर्यंत या गर्दीचं रुपांतर मतात होताना कमी पाहायला मिळालं. मनोरंजन म्हणून भाषण ऐकणं आणि सभेला गेल्यानंतर मत देणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. राज ठाकरे यांचे जुने सहकारी आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी प्रचार सभेत सहभाग घेतला. कोकणातील सभेत राज यांनी नारायण राणेंचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच राणेंना निवडून देण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी कोकणवासीयांना केलं. मात्र, राज ठाकरेंचं भाषण मतदारांवर प्रभाव पाडू शकेल का? हा खरा प्रश्न आहे.
...त्यामुळं राणेंना फायदा होईल : यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना भाजपा प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, "राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाचा नक्कीच नारायण राणेंना फायदा होईल. राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा ते एक लोकप्रिय नेते होते. नारायण राणे आणि राज ठाकरे हे जुने सहकारी असून त्यांनी एकत्र काम केलंय. त्यामुळं राज यांच्या भाषणाचा नक्कीच तिथल्या मतदारांवर प्रभाव पडेल. तसंच नारायण राणे हेच जिंकून येतील", असा विश्वासही यावेळी हाके यांनी व्यक्त केला.