नागपूर Rashmi Barve VS Mahayuti : रश्मी बर्वेंच्या (Rashmi Barve) जात वैधता प्रमाणपत्र विरोधात भाजपा किंवा महायुतीकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तर एका स्थानिक पत्रकारांनं ही तक्रार केली होती. तरी देखील रश्मी बर्वे भाजपा आणि महायुती विरोधात आरोप करत आहेत. आज न्यायालयानं त्यांना पूर्ण दिलासा दिलेला नाही. तरी देखील त्या सरकार विरोधात मोठी लढाई जिंकल्याचा भ्रम पसरवत असल्याचा आरोप, आमदार आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केलाय. तर या आरोपांना रश्मी बर्वे यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.
रश्मी बर्वें विरुद्ध महायुती सामना: रश्मी बर्वे म्हणाल्या की, दलित समाजच्या एका महिलेकडून पराभव स्वीकारायचा नव्हता, म्हणून रातोरात कटकारस्थान रचून माझं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा भाजपा नेत्यांनी कट केलाय. त्यामुळं एकीकडं लोकसभा निवडणुकची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सुरू झाली असताना, रश्मी बर्वें विरुद्ध महायुती असा एक सामना नागपुरात रंगला आहे.
रश्मी बर्वेंना न्यायालयानं पूर्ण दिलासा दिलेला नाही: रामटेक लोकसभा मतदारसंघात जाणीवपूर्वक महाविकास आघाडीकडून भ्रम पसरवला जात असल्याचा आरोप महायुतीचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केलाय. सुनील साळवे यांनी रश्मी बर्वेंच्या विरोधात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली, त्यासाठी अनेक महिने त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवर रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलय. यामध्ये भाजपा, शिवसेनेना किंवा राज्य सरकारला काही घेणं देणं नाही, तरी देखील रश्मी बर्वे सातत्याने याकरता आम्हाला दोषी धरत आहेत. जात पडताळणी समितीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारणानं यापूर्वी आमचे देखील अनेक सरपंच, उपसरपंच हे अवैध झाल्याचं आशिष जैस्वाल यांनी सांगितलं.
सहानुभूती मिळवण्यासाठी खोटा प्रचार : आशिष जैस्वाल म्हणाले की, आज न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला नाही, शिवाय निवडणूक लढण्याची परवानगी दिलेली नाही. उच्च न्यायालयानं दिलासा दिला असाचं भ्रम रामटेक लोकसभा मतदारसंघात पसरवला जात आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी महाविकास आघडीचे नेते हे चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत भ्रम पसरवत आहेत, अंतिरिम स्थगिती म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र पूर्ववत होत नाही. केवळ पराभवाच्या मानसिकतेतूनचं हा भ्रम निर्माण केला जात आहे.
खोटं जास्त काळ टिकू शकत नाही: श्री रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेक मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार शुद्ध चारित्र्याचा असावा अशी लोकांची धारणा आहे. त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसावे, पण श्याम बर्वे यांच्यावर दाखल गुन्हाची यादी बघावी असं देखील आशिष जैस्वाल म्हणाले.