रत्नागिरी Ramdas Kadam on BJP : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्यातील लोकसभा मतदार संघावरुन विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्येच एकमेकांना प्रति आव्हानं दिली जात आहेत. आम्हीच ही जागा लढवणार असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जातोय. "ही जागा भाजपाची असून भाजपाच ही जागा लढवणार," असल्याचं पोस्ट केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली होती. त्यांच्या या पोस्टनंतर शुक्रवारी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी भाजपावर बोचरी टीका केलीय.
रामदास कदमांचा भाजपावर निशाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या पोस्टवर शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणाले, "सर्व पक्ष संपवून फक्त भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेना सोडणार नाही. तसंच आपण दोघं भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू," असा टोला रामदास कदम यांनी भाजपाला लगावलाय. त्यामुळे एकूणच या जागेवरुन वातावरण तापलं असून दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी यावर कसा तोडगा काढतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.