कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर महायुतीचा अनुभव पाठीशी असल्यामुळं सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात उतरवण्यात आलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाशक्ती परिवर्तन आघाडी गेम चेंजर ठरेल, तसंच निवडून येणाऱ्या आमदारांच्या बळावर महायुती आणि महाविकास आघाडीला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा तिसऱ्या आघाडीचे नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीतून दिला.
जाहीरनाम्यात शेतकऱ्याचा उल्लेखही नाही : "राज्य कृषी प्रधान असूनही सत्ता भोगलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील बळीराजाबाबत कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. 9 हजार प्रतिक्विंटल दर असलेला सोयाबीन 2 वर्षात 4 हजारांवर आला, दहा हजारांचा कापूस साडेचार हजारांवर आला, कांदा, मका दुधाच्या उत्पादनाचं वाटोळं झालं. साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती, तर उसाला प्रति टन अजूनही 1 हजार रुपये शेतकऱ्याला जादा मिळाले असते. मात्र, केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून बळीराजाला फसवलं. शेतकरी विरोधी धोरण राबवून सरकार शेतकऱ्याला खड्ड्यात घालत आहे. जाहीरनाम्यात साधा शेतकऱ्याचा उल्लेखही केला जात नाहीय. विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही," असा इशारा राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला दिला.
साखर कारखानदारांना आमदारकीचं कवच कुंडल : राजू शेट्टी पुढं बोलताना म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा जागांवर 13 उमेदवार साखर कारखानदार आणि दोघे साखर कारखानदारांचे हस्तक असे मिळून 15 उमेदवार उभे आहेत. प्रचंड गैरव्यवहार करून या साखर कारखानदारांनी एका मताचा आकडा दोन हजारांवर नेऊन ठेवलाय. साखर कारखानदारांनी केलेला गैरव्यवहार झाकून ठेवण्यासाठी त्यांना आमदारकीचं कवच कुंडल लागतं, सत्तेचं कवच कुंडल लागतं, त्यांना ते मिळवून द्यायचं नाही, अशी रणनीती यंदा आम्ही बनवली आहे."