नागपूर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांना पोलिसांनी सोमवारी (१७ फेब्रुवारी) नागपुरात अटक केली. त्यानंतर तुरुंगात रवानगी करण्यापूर्वी त्यांना 'मेयो' या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं असता हर्षवर्धन जाधव यांनी छातीत वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यामुळं त्यांना पुढील २४ तास पोलिसांकडून वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय.
नेमकं काय आहे प्रकरण? : २०१४ मध्ये नागपुरात राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आले होते. ठाकरेंच्या आगमनावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारीही विमानतळावर उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांचा मंत्रालयीन सहायकाशी वाद झाला होता. त्यानंतर जाधव यांच्या विरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असताना न्यायालयानं हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, जाधव न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते.
नॉन बेलेबल वॉरंट जारी : खटल्याच्या सुनावणीवेळी जाधव आतापर्यंत न्यायालयात हजर राहिले नाहीत. यावरुन न्यायालयानं त्यांच्या विरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. या अटक वॉरंटवरुन हर्षवर्धन जाधव सोमवारी न्यायालयात हजर होण्यासाठी नागपूर येथे आले. तेव्हा पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात त्यांना अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
२४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली : तुरुंगात रवानगी करण्यापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करताना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्यांनी छातीत दुखत असल्याची डॉक्टरकडं तक्रार केली. त्यांना २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
हेही वाचा -
- Harshavardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; नितीन गडकरींच्या घरी तब्येत बिघडली
- Harshvardhan Jadhav On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळेच...; हर्षवर्धन जाधवांचा गौप्यस्फोट
- Pune Crime News : गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर लैंगिक टोमणे; हर्षवर्धन जाधवांविरुद्ध गुन्हा दाखल