प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मतदार संघात दौरा पूर्ण केला आहे. महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही, आम्ही 'एकला चलो रे'ची भूमिका घेतलीय. आम्हाला कुणाचा प्रस्ताव आला नाही. महाविकास आघाडीनं माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की, नाही हे त्यांनी ठरवावं. त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर, मी स्वागतच करेन अशी रोखठोक भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.
'या' लोकसभा मतदारसंघात आमची तयारी चालू : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाविकास आघाडीचा पूर्वानुभव लक्षात घेता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'आम्ही एकला चलो रे' ची भूमिका घेतली आहे. राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, परभणी, माढा या लोकसभा मतदारसंघात आमची तयारी चालू आहे. या जागा आम्ही लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं. यंदाची लोकसभेची निवडणूक मी मतदारांवर सोडली आहे. त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं, विरोधकांनी आठ हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला आहे. मात्र त्यापैकी किती कामे झाली हे जनता बघून घेईल, मी आता कुणावरही टीका करणार नाही. कारण पाच वर्षे किती काम झालं हे मतदारांनी पाहिलं आहे, मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचं शेट्टी यावेळी म्हणाले.
विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याला हमी कशी : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जवळील साखर कारखानदारांच्या 660 कोटी रुपये कर्जाची हमी घेतली आहे. मात्र भाजपाने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखानदारांवर पैशांची खैरात केली असल्याची टीका, राजू शेट्टी यांनी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना हमी देण्यास विरोध केला होता त्यावेळी मी समर्थन केलं होतं. मात्र आता विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला हमी दिली जाते, त्यामध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला हमी दिली जात नाही. मग लोकसभा निवडणुका समोर ठेवून जनतेच्या पैशांची उधळण केली जात आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
मोदी का परिवार पेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोदी का परिवार ही टॅगलाइन सोशल मीडियावर व्हायरल केली. यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, या देशाचं राजकारण कधीच व्यक्ती केंद्रित झालं नाही, असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही. त्यामुळं भाजपानं 'मोदी का परिवार पेक्षा आम आदमी का परिवार' म्हणावं. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग होऊ घातला आहे. मात्र याला कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून सुपीक जमिनी जात असल्यानं शेतकरी अस्वस्थ झाला आहे. एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभा करायचे आहेत, असा खडा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारलाय.
हेही वाचा -
- जागा वाटपावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील - शंभूराज देसाई
- लोकसभा निवडणुकीत अडीच लाख उमेदवार भरणार अर्ज? मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं निवडणूक आयोगासमोर पेच होण्याची शक्यता
- बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंची प्रचारात आघाडी; आपल्या कार्याची अहवाल पुस्तिका केली प्रसिद्ध