ठाणे :ठाण्यातील महत्त्वाची आणि तिरंगी समजली जाणारी निवडणूक रंजक होणार आहे. कारण ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे यांनी भाजपाच्या संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. यावर आता निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे.
संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप : मंगळवारी (२९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजपासून अर्जाच्या छाननीला सुरूवात झालीय. ही छाननी सुरू असताना राजन विचारे यांनी संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावर गुन्ह्याची माहिती लपवण्याचा आक्षेप घेतला. त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन विचारे आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार झाले आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर राजन विचारेंच्या आक्षेपानंतर आता सुनावणी घेण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया देताना राजन विचारे (ETV Bharat Reporter)
मनसे उमेदवाराकडे लक्ष: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव हे मनसेचे उमेदवार असून त्यांनी 2019 साली निवडणूक लढवत सत्तर हजाराच्या वर मतं मिळाली होती. त्यावेळेस ही निवडणूक दोघांमध्ये रंजक झाली होती. आता यावेळी राजन विचारे यांच्या उमेदवारीमुळं निवडणूक तिघांमध्ये होणार आहे. मनसेनं मागील वेळी मिळवलेल्या मतांमुळं यंदा देखील किती मतं मिळवतात याकडं ठाण्याचं लक्ष लागलं आहे.
ठाणे शहर मतदारसंघांमध्ये बंडखोरी?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये लढती कशा असतील याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचे केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि मनसेचे अभिजित पानसे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये फारसे उमेदवार नाहीत, मात्र ठाणे शहर मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाच्या संजय केळकर या विद्यमान आमदारापुढे मनसेचे अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा -
- विक्रोळी मतदारसंघाची काय आहे परिस्थिती? दोन शिवसेना आमनेसामने; कोण मारणार बाजी?
- श्रीरामपूरमध्ये महायुतीत बिघाडी; माजी खासदार लोखंडे पितापुत्राने दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
- हवाई प्रवासावर नेत्यांची भिस्त; कमी कालावधीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी हेलिकॉप्टर प्रवासाला प्राधान्य