मुंबई : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी 7 डिसेंबरला पहिल्या दिवशी विरोधकांनी ईव्हीएम मतदानात घोळ असल्याचा आरोप करत शपथविधीवर बहिष्कार घातला. परंतु महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी आणि रईस शेख यांनी शनिवारीच आमदारकीची शपथ घेतली. शपथ आणि ठाकरेंचं हिंदुत्व या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतून समाजवादी पक्ष बाहेर पडला. त्यानंतर समाजवादी पक्ष हा भाजपाची बी टीम असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. तर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. "लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जी मतं मिळाली, ती कुठली होती ते अगोदर बघा, सर्व धर्मांचा सन्मान करा." असं रईस शेख म्हणाले.
आमचं हिंदुत्व हे हाताला काम आणि हृदयात राम : महाविकास आघाडीच्या आमदारांनी शनिवारी 7 डिसेंबरला शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातलेला असताना समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतल्यामुळे महाविकास आघाडीत समाजवादी पक्षावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाच्या या कृत्यावर शिवसेना (उबाठा) पक्ष मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "यूपीमध्ये समाजवादी पक्ष अखिलेश यादव चालवतात. तिथे ते इंडिया आघाडीचं चांगलं नेतृत्व करत आहेत. परंतु, महाराष्ट्रामध्ये समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे. आमची भूमिका अत्यंत स्पष्ट असून, आमचे हिंदुत्व हे हाताला काम आणि हृदयात राम अशा प्रकारचं आहे. आमचा एकमेव असा पक्ष आहे जो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं ठामपणे सांगतो."