पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरदचंद्र पवार) वडगाव शेरी या मतदारसंघातून बापू पठारे यांना उमेदवारी जाहीर केलीय. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात सभा घेतली. या सभेत सुप्रिया सुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावरून शरद पवारांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव न घेता त्या म्हणाल्या. "इथल्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली आहे. पोर्श कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल, तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. असं त्या नोटीसमध्ये लिहिलंय”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? :यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांनी सही केली होती. त्याच व्यक्तीनं आज शरद पवारांना पोर्श कार अपघात प्रकरणी नोटीस पाठवली आहे. ‘माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन’ असं त्या आमदारानं (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीसीद्वारे बजावलंय. मी त्या व्यक्तीला आव्हान देते करते की, तुम्ही म्हणाल ती वेळ आणि तुम्ही म्हणाल ती जागा. पण मी या अपघात प्रकरणात न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मला, सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना नोटीस पाठवून दाखवा. आम्ही लढू, कारण आम्हाला कोणाची भीती नाही."