वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर छत्रपती संभाजीनगर Prakash Ambedkar : भारतीय जनता पार्टी आता घाबरली असून त्यामुळं ते दुसऱ्याला घाबरवण्याचं काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. "भाजपाचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा सुरुच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन अवतार पाहायला मिळाला. देवानं मला आदेश दिला म्हणून राम मंदिर तयार झालं, असं त्यांनी सांगितल्यावर साधुसंतांमध्ये राग व्यक्त केला जातोय आणि त्याचा परिणाम नक्कीच होईल. त्यांनी 400 हून अधिक जागा निघण्याचा निर्धार केलाय. मात्र ते दीडशे जागा जिंकतील, असा अंदाज असल्यानं ते घाबरुन पक्ष फोडण्याचं, दादागिरी करण्याचं आणि लोकांना भीती दाखवण्याचं काम करत आहेत," अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
महाविकास आघाडीनं लवकर निर्णय घ्यावा : "अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळं महाविकास आघाडीबाबत बोलणी थांबली होती. मात्र, आता बोलणी पुन्हा सुरु होणार असल्याचा आनंद आहे. आम्ही आघाडीचे निमंत्रित आहोत, आमचा मसुदा आम्ही तयार केला असून त्यावर विचार होऊन तो मंजूर होईल, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात बोलणी लवकर व्हावी. त्यांचं जागावाटप झालं तर आम्हाला देखील बोलता येईल आणि आमच्या जागा आम्हाला त्यातून मागता येतील. त्यामुळं लवकरात लवकर बोलणी व्हावी आणि लोकसभेत एकत्र निवडणूक लढवावी," अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीय. तसंच "आम्ही सर्व जागांवर आम्ही आमची तयारी करत आहोत," असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
लोक शरद पवारांना विसरणार नाहीत : "बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. अजित पवार म्हणाले की, मी लढणार असं समजा, पण त्यांच्या पत्नीचं नाव असलं तरी, आम्हाला असं वाटतं की ते स्वतः लढतील. त्या मतदार संघात शरद पवारांची कारकीर्द खूप जुनी आहे. त्यांनी तिथं अनेक वेळा निवडणूक लढवलीय. त्यामुळं इतक्या लवकर लोक त्यांना विसरतील असं वाटत नाही," असं म्हणत अजित पवार यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. "आता जरी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा एकत्र लोकसभा लढवत असतील, मात्र विधानसभेबाबत अद्याप सांगता येणार नाही," असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
जरांगेंनी निवडणूक लढवावी : "मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा सुरु केलेला लढा इतक्या लवकर थांबेल असं वाटत नाही. सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत शंका येणं अपेक्षित आहे. मात्र, मागणी म्हणावी तशी पूर्ण झालेली नाही," असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. "मनोज जरांगे यांनी येणारी लोकसभा लढवावी ते नक्कीच निवडून येतील. कोणत्याही पक्षाच्या बाजूनं त्यांनी जाऊ नये, कारण पक्षाचे निर्बंध येतील. मात्र त्यांनी अपक्ष लढावं त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना वेळ भेटेल. या काळात त्यांनी स्वतःचा पक्ष काढून एक स्वतःची ताकद निर्माण करावी. लोकसभा आणि विधानसभेत आपला लढा सुरु ठेवावा. ते भल्याभल्यांना भारी पडतील," असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तर "ओबीसी नेते स्वतःचा पक्ष काढत आहेत, त्याचं आपण स्वागत करतो. यापुढं त्यांच्यात जागरुकता येईल आणि धार्मिक पक्षांना बळी पडणार नाहीत," असंही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलंय.
हेही वाचा :
- मनोज जरांगे पाटील आक्रमक; 24 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
- भ्रष्टाचारी नेत्यांचा गट म्हणजे 'इंडिया' आघाडी; जे पी नड्डांचा हल्लाबोल