मुंबई : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या परीनं दिवाळी पाडवा साजरा करतात. मात्र, बारामतीतील गोविंद बाग येथे संपूर्ण पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण अनेक अर्थानं वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो.
पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश-विदेशात वास्तव्यास असतात. त्यामुळं सर्वांची एकत्रित भेट व्हावी यासाठी, मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त एकत्रित येतात. एकत्रित येऊन दिवाळीचा सण मोठ्या आनंद उत्साहात साजरा करतात. मात्र, यंदाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार हे उपस्थित राहणार की नाही? यासंदर्भात चर्चांना उधाण आलं होतं. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय.
पोस्ट करत दिली माहिती :दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी पवार कुटुंबीय नागरिकांसह कार्यकर्त्यांना भेटत असतात. तसंच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, कलाक्रीडा, आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंद बागेत दाखल होत असतात. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यंदाचं चित्र बदललंय. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या दिवाळी पाडव्यामध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत यंदाचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार असल्याची माहिती दिली आहे. "बारामतीकरांनो, सालाबादाप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करूया. दीपावली पाडवानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचं स्वागतो करतो. चला, बंधुभाव जपूया", असं म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांना दिवाळी पाडव्याला येण्याचं आवाहन केलं आहे.
- विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) नेते तथा त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळं बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यामुळं कुटुंबात फूट पडल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी अजित पवारांची नक्कल करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. दरवर्षी या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात गर्दी वाढताना दिसते. परंतु, यंदा दोन ठिकाणी पाडवा असल्यानं बारामतीकर कुठं जाणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.
हेही वाचा -
- युगेंद्र पवार म्हणाले, "पवारांना साथ दिली तशी मलाही..."
- पुण्यात 'बंडोबां'नी वाढवली महाविकास आघाडीची डोकेदुखी; कसबा पेठ, पर्वतीसह शिवाजीनगरमध्ये थोपटलं दंड
- शरद पवारांचा पूर्व विदर्भावर फोकस; मात्र 'या' पक्षाला सन्मानजनक जागा पदरात पाडून घेण्यात अपयश