नांदेड PM Narendra Modi Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज की जय, सर्वांना राम राम, नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार 26 तारखेची तयारी झाली आहे ना? असा प्रश्न विचारत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा स्थानिकता जपण्याचा प्रयत्न केला. तसंच एनडीए सरकारमुळं देशात विकास होत असल्याचं सांगताना 'इंडिया' आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली.
चार दिवसांनी एकमेकांचे कपडे फाडतील :नांदेडमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'इंडिया' आघाडीतील पक्ष एकत्र आलेत. निवडणूक घोषणाच्या पूर्वीच काँग्रेसनं आपला पराभव मानला आहे. लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीला उमेदवार मिळत नाही. त्यांचे नेते प्रचार करत नाहीत. देशात 25 टक्के जागा अशा आहेत तिथं ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा, त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चार दिवसानंतर 'इंडिया' आघाडी एक दुसऱ्यांचे कपडे फाडून घेणार आहेत."
कॉंग्रेसचा परिवारच त्यांना मत देणार नाही : यावेळी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर टीका केलीय. राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटत आहे. 26 एप्रिलला जसं वायनाडमध्ये मतदान होईल. त्यानंतर, राहुल गांधींसाठी आणखी एका जागेची घोषणा करुन त्यांना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. तसंच केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दाखला देत काँग्रेस तसंच 'इंडिया' आघाडीला टोला लगावलाय. काँग्रेसचा परिवारच, या निवडणुकीत काँग्रेसला मत देणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, जिथं ते राहतात तिथंच काँग्रेसचा उमेदवार नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची होईल याचा कधी कुणी विचार केला होता का, असा सवालही मोदींनी केला. तसंच काँग्रेस गरीब, दलित, वंचित आणि शेतकऱ्यांच्या विकासातील भिंत बनली होती. एनडीए सरकार सर्वांसाठी काम करतं तेव्हा काँग्रेस टीका करते, असंही ते म्हणाले.
चव्हाण कुटुंब आमच्यासोबत :पुढं अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्याचा उल्लेख मोदींनी आवर्जून केला. 'अशोकजी हमारे साथ आ गये ये खुशी की बात है,' असं सांगत दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यामुळं आपण सत्यसाई बाबांना भेटलो. शंकरराव चव्हाणांकडून आपल्याला खूप काही शिकायलं मिळालं, आज ते कुटुंब आमच्यासोबत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मिशन मराठवाडा'; आज नांदेडसह परभणीत घेणार प्रचारसभा - PM Narendra Modi Rally
- पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचं 'संकल्प पत्र' जाहीर; 'या' दोन मोठ्या घोषणांसह अनेक आश्वासनं - BJP Manifesto
- 2014 चा 'जुमला' आता 2024 ला 'मोदी गॅरंटी'! राज्यात मोदी गॅरंटी नव्हे तर ठाकरे गॅरंटी चालते, आदित्य ठाकरेंचा दावा - Lok Sabha Election 2024