Lok Sabha Election 2024:लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिलीय. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांकडुन झालेल्या वैयक्तिक हल्ल्यांशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोणी मला 'मौत का सौदागर' तर कोणी मला "घाणेरड्या नालीतील किडा' म्हटलं. मी तब्बल 24 वर्षांपासून हे सर्व सहन केलयं. त्यामुळं मला आता याचा अजिबात फरक पडत नाही," असं मोदी म्हणालेत.
अपशब्द वापरणं विरोधकांचा स्वभाव : पंतप्रधान मोदी म्हणाले, "संसदेत आमच्या एका सहकाऱ्यानं 101 शिव्या मोजल्या होत्या. त्यामुळं निवडणुका असो की नसो विरोधक मानतात की शिवीगाळ करण्याचा त्यांना अधिकार आहे. सातत्यानं अपशब्द वापरणं हा विरोधकांचा स्वभाव बनलाय. मी एससी, एसटी, ओबीसी आणि इतर मागासवर्गीय लोकांना सावध करू इच्छितो. कारण त्यांना अंधारात ठेवून विरोधक लुटत आहेत. जे स्वत:ला दलित-आदिवासींचे हितचिंतक म्हणून घेतात, तेच खरे या जनतेचे कट्टर शत्रू आहेत."
बंगालमध्ये एकतर्फी निवडणूक :पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, "तृणमुल बंगालच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 3 वर होतो. बंगालच्या जनतेनं आम्हाला 80 वर नेलं. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं. यावेळी संपूर्ण भारतात सर्वोत्तम कामगिरी करणारं कोणतंही राज्य असेल तर ते पश्चिम बंगाल असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथील निवडणूक एकतर्फी आहे."