नवी दिल्ली :राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेलं असताना संसदेच्या मकरद्वारावर धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजपाचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडं कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळं हा प्रकार घडल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.
राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल :ओडिशाचे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी आणि फर्रुखाबादचे भाजपा खासदार मुकेश राजपूत गुरुवारी (19 डिसेंबर) सकाळी संसदेच्या मकरद्वारावर झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्या खासदाराला धक्का मारल्यामुळं ते माझ्या अंगावर पडले आणि गंभीर जखमी झाल्याचा आरोप खासदार सारंगी यांनी केलाय. प्रताप सारंगी मीडियासमोर आले तेव्हा त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तसंच या प्रकरणी भाजपानं दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर आणि बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक नेत्यांनी बाजू मांडली. भाजपाच्या शिष्टमंडळानं संसद पोलीस ठाण्यात जाऊन आपलं म्हणणं मांडलं आणि योग्य कारवाईची मागणी केली.
तक्रार दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुराग ठाकूर म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि चिथावणी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत आज मकरद्वारच्या बाहेर घडलेल्या घटनेचा आम्ही तपशीलवार उल्लेख करण्यात आलाय. आम्ही कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत तक्रार दिली आहे. कलम 109 हत्येचा प्रयत्न आहे." अशा प्रकारची तक्रार दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात कलम 115: स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 117: गंभीर दुखापत करणे, कलम 125: जीवन आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, कलम 131: गुन्हेगारी शक्तीचा वापर, कलम 351: गुन्हेगारी धमकी, कलम 3(5): समान हेतूसाठी कार्य करणे अशा कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.