मुंबई EVM Hacking : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चूरस पाहायला मिळाली होती. अवघ्या 48 मतांनी शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला होता. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर यांनी केला होता. त्यातच मतमोजणी केंद्रावर खासदार रवींद्र वायकर यांच्या निकटवर्तीयांकडं मोबाईल सापडल्यामुळं किर्तीकरांच्या आरोपाला खतपाणी मिळालं होतं. ईव्हीएम यंत्रात कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येत नसून, ईव्हीएम हॅक (EVM Hacking) होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी (Vandana Suryavanshi) यांनी दिलं.
ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज नाही : मोबाईलच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रावर फेरफार झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या की, "ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली आहे. ईव्हीएम ओटीपीवर ओपन होत नाही. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते. तसेच ईव्हीएम मशीन कोणत्याही उपकरणाशी जोडले देखील नाही. त्यामुळं यासंदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे. याप्रकरणी संबंधित वृत्तपत्रावर आयपीसी 499 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नोटीस देखील पाठवण्यात आली आहे."