मुंबई Nitesh Rane On Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीत काही जागांमुळं जागा वाटपाचा तिढा सुटायला तयार नाही. याच पार्श्वभूमीव सोमवारी (25 मार्च) संध्याकाळी 'मातोश्री'वर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. तर या बैठकीवरुन आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. तसंच काँग्रेस विरहित निवडणूक लढवण्यासाठीच ही बैठक पार पडल्याचा, दावाही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले नितेश राणे? : या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणे म्हणाले की, "मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. बैठकीत काँग्रेस विरहित निवडणूक कशी लढवायची, यावर चर्चा झाली. याचाच अर्थ काँग्रेससोबत सुरू असलेली महाविकास आघाडीच्या नावानं चर्चा आता संपल्यात जमा आहे. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिलाय. तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमच्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींशी बोला. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू इच्छित नाही, असं कॉंग्रेस नेते म्हणताय. तसंच हे खरं आहे की खोटं, हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं."
संजय राऊतांवरही साधला निशाणा : यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत राणे म्हणाले की, "संजय राऊत यांच्यावर आता कोणालाच विश्वास राहिलेला नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील राऊतांना खोटारडं म्हणालेत. आमचा विषय तर सोडाच, मात्र महाविकास आघाडीतील लोकांना देखील आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही."