मुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील 6 जागांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. बीकेसी येथील मैदानावर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला खर्गे संबोधित करणार आहेत. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांसह इंडिया आघाडीतील इतर नेते देखील या प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत. तर, दुसरीकडे दादरच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आज मुंबईकरांना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे.
NDA विरुद्ध INDIA सामना (Source- ETV Bharat reporter) Live update
- आज मुंबईतील महायुतीच्या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चैत्यभूमी येथील भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर स्मारक, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करणार आहेत.
शिवाजी पार्क, दादर, बीकेसी येथे 'जाहीर सभा' तसेच वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनही ठिकाणी मोठ्या संख्येने अति महत्त्वाचे व्यक्ती, समर्थक व क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार आहेत. यामुळे मरीन ड्राइव्ह, पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, आज सकाळी १० ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. विमान किंवा रेल्वेने प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची पर्यायी योजना करून गैरसोय टाळण्याचं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा होणार आहे. या दोन्ही सभांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींसोबत शिवाजी पार्कवरील सभेला उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेसमधील गांधी घराण्यातील कोणताही सदस्य बीकेसी येथील सभेला उपस्थित असणार नाही. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ममता बॅनर्जीसह अखिलेश यादव हे हजर राहणार नाहीत-बीकेसी मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, आपापल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवारातील एकही सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे लक्ष मुंबईतील 6 जागा तसेच आसपासच्या 13 जागांवर आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह-शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह अन्य पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपासह मनसेच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रोड शोमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यात आता मोदींच्या सभेमुळे आणखी भर पडणार आहे.
पंतप्रधानांह राज ठाकरेंच्या भाषणाकडं सर्वांच असणार लक्ष-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो' व्हिडिओ म्हणत दादरच्या शिवाजी पार्कवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणू देण्यास विरोध केला होता. तेच राज ठाकरे आज त्याच दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे पंतप्रधानांबाबत एकाच मंचावर सहभागी होऊन काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार-महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. हे मतदान धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघासाठी होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील सहा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
हेही वाचा-
- नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मुंबईच्या सर्व जागा महायुती जिंकणार - रामदास आठवले - Ramdas Athawale Assurance
- लोकसभा निवडणूक; ...यांच्यामुळं मोदींना रोडवर उतरावं लागलं?; काय आहेत कारणे? घ्या जाणून - Modi have to come on road in Mumbai
- पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात अजित पवार यांचा सहभाग नसल्यानं चर्चांना उधाण - Lok Sabha Election 2024