मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा कळवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबईत पार पडली बैठक : पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित आर. आर. पाटील यांची, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाबाबत पुढील काळात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले. पक्षाच्या विजयी झालेल्या १० आमदारांपैकी ९ आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात सत्कार समारंभ असल्याने ते अनुपस्थित होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
मतदान वाढणे ही चिंतेची बाब : "विधिमंडळात आमचे कमी सदस्य असले तरी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे आमदार जनतेचे प्रश्न धडाडीने मांडतील," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत पाच वाजल्यानंतर सुमारे आठ टक्के मतदान वाढले, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान वाढणे ही चिंतेची बाब आहे. मतदान झाल्यानंतर सतत मतं वाढत जाणे व सी १७ अर्जाशी मतदानाची आकडेवारी न जुळणे ही गंभीर बाब आहे. अतिरिक्त मतदानाची चौकशी व्हावी, निवडणूक आयोगाने वेबसाईट बंद करुन माहिती लपवली आहे, हे प्रकार जाणिवपूर्वक का होतात? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या मागणीला पाटील यांनी पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
सत्ता मिळाली, आता लाडकी बहीण योजनेत... : ६५ वर्षांवरील महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. मात्र, सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजना लोकप्रिय असल्याने सरकारला विजय मिळाल्याचा सत्ताधारी पक्षांचा दावा आहे. नवीन वर्षांत लाडकी बहीण योजनेत १५०० ऐवजी २१०० रुपये मिळावेत, सोयाबीन उत्पादकांना योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, यासह ज्या ज्या घोषणा केल्या त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.