नागपूर : भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार थेट महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. भाजपानं सिंचन घोटाळ्याचा केलेला आरोप खोटा असल्याचं मान्य करावं, असं त्या म्हणाल्या. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
आरोप खोटा असल्याचं मान्य करावं : "देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. याची चौकशी झाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित होतं. फडणवीस यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. असं असताना आरोप केलेल्या व्यक्तीला घरी बोलावून त्यांनी फाईल दाखवली. मुख्यमंत्र्याच्या घरात बसून अजित पवारांना फाईल दाखवली, हे मी म्हणत नाही तर अजित पवार स्वत: म्हणाले होते," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपानं सिंचन घोटाळ्याचा केलेला आरोप खोटा असल्याचं मान्य करावं," असंही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना (Source - ETV Bharat Reporter) विरोधक कसा दिलदार असावा : "मला खरंतर देवेंद्र फडणवीसांकडून फार अपेक्षा होत्या. विरोधक म्हणून माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. युवा कर्तृत्ववान नेता, पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मी विरोधात असले तरी, विरोधक कसा दिलदार असावा लागतो. मी त्यांच्याकडे खूप आदरानं पाहात होते. मात्र, त्यांनी मी दोन पक्ष फोडून आलो, असं म्हटलं. त्यांचं हे विधान अस्वस्थ करणारं होतं." असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पहाटेच्या शपविधीबद्दल माहिती नव्हती : पहाटेच्या शपथविधी संदर्भात अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "पहाटेच्या शपथविधीविषयी मला काहीच माहिती नव्हती. पहाटेच्या शपविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. मला सकाळी उठवण्यात आलं तेव्हा शपथविधी विषयी कळलं. बैठक झाली की नाही याचं उत्तर अजित पवारचं देऊ शकतात," असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा
- 'लाडकी बहीण योजना' आणली, पण 850 पेक्षा अधिक मुली गायब झाल्यात त्याचं काय", शरद पवार यांचा टोला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करत नाहीत, नेमकं काय असेल कारण?
- शरद पवार जातीपातीचं राजकारण करत नाही; रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती