मुंबई NCP Meeting : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशामुळं सत्ताधारी महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढलीय. परिणामी लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी संध्याकाळी ट्रायडन्ट मधील बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान काय चुकलं आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय करायचं यावर मंथन झालं.
विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेणार : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. बैठकीत लोकसभा निवडणूक पार पडली त्या अनुषंगानं 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. अपेक्षित असलेलं यश पक्षाला आणि महायुतीलाही मिळू शकलेलं नाही. याविषयी सविस्तरपणे आम्ही चर्चा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. पक्षाचा पंचविसावा वर्धापन 10 जून रोजी आहे. त्या अनुषंगानं देखील बैठकीत चर्चा केली. कोअर कमिटीच्या बैठकीत देखील वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे आम्ही महायुती म्हणून सामोरं जाणार असल्याच तटकरे यांनी म्हटलंय. तसंच मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीचे नेते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित येऊन निर्णय घेतील. केंद्रातील नवीन सरकारमध्ये आपल्या वाटेला मंत्रिपद येणार आहे का, यावर बोलताना तटकरे म्हणाले की या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेतील.
तो दावा खोटा : काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले की, "आमदार संपर्कात आहेत, अशा प्रकारच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकसंघ सोबत आहेत. निवडणुकीत देखील अशाप्रकारे अफवा, खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले." तसंच जे पूर्वी आमच्या सोबत होते ते सगळे आमदार आज देखील सोबत आहेत. उलट त्यांच्या पक्षाचे काहीजण काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहे त्यांचं ते ठरवतील. यापेक्षा जास्त काही आपण बोलणार नसल्याचं तटकरे यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे एनडीएची महत्वाची बैठक शुक्रवारी दिल्लीत होत आहे. या बैठकीला एनडीएच्या सर्व खासदारांची उपस्थिती राहणार आहे. बैठकीनंतर एनडीएचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यासाठी अध्यक्ष अजित पवार, मी आणि प्रफुल पटेल बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहोत.
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांचं आमदारांसोबत 'मंथन'; तर शिंदेंकडून नवनिर्वाचित खासदारांना 'स्नेहभोजन' - Lok Sabha Result
NCP Meeting : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी संध्याकाळी ट्रायडन्ट मधील बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
Published : Jun 6, 2024, 10:50 PM IST
एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन : लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना चांगलं यश मिळालं. त्यानंतर आज निवडून आलेल्या शिंदे गटातील नवनिर्वाचित खासदारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांना पुढील कामासाठी मार्गदर्शन केलं. तसंच शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदाराना भेटून त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांच्याशी संवाद साधला.
हेही वाचा :