महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब? - Nashik Lok Sabha

लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्यापही स्पष्टता झाली नाही. या मतदारसंघावर महायुतीमधील शिवसेनेसोबत भाजपाही दावा केला आहे. अशात या मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय समता परिषद पदाधिकाऱ्यांची भुजबळ यांनी बैठक घेतली. त्यामुळे भविष्यात भुजबळांनी निवडणूक लढवल्यास आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती आहे.

Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 11:04 AM IST

नाशिक- महायुतीत नाशिक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सलग 10 वर्ष नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. अशातच माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं राज्यात सत्तेत असलेला भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी?दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडूनदेखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. मात्र, केंद्रात सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपाला प्रत्येक जागा महत्त्वाची असल्यानं या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह दिल्लीमधून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं बोललं जातंय. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवल्याचंही बोललं जात आहे. मात्र, याबाबत अधिक बोलण्यास सूत्रांनी नकार दिला आहे.


भुजबळच का?छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत विविध पदे भूषवली आहेत. तसेच सत्ताकाळात येवल्यासह नाशिकचाही विकास त्यांनी केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास नाशिकमध्ये मराठा समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत. त्या पाठोपाठ ओबीसी, वंजारी, दलित, मुस्लिम आणि इतर मतदार आहेत. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनावेळी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे सरकारलादेखील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वातंत्र्याचा 10 टक्के आरक्षण देणे भाग पडलं होतं. एकूणच या आंदोलनात भुजबळांनी एकाकी लढत दिल्याचं चित्र होते. तसेच बहुतांश भाजपाच्या मतदार हा 'माधव' अर्थात माळी, धनगर आण वंजारी हा आहे. भविष्यात हा मतदार ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहील, असा भाजपाला आशावाद आहे.

म्हणून राष्ट्रवादीला एक जागा मिळाली पाहिजे-राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, " याबाबत तिन्ही पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतील. भुजबळ कुटूंबाला उमेदवारी पाहिजे, अशी माझी मागणी नाही. साताऱ्याची जागा भाजपने घेतली असल्यानं त्याबदल्यात राष्ट्रवादीला एक जागा मिळावी, ही चर्चा खरी आहे. पण जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासोबत बैठक होत आहे. मात्र,आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खाते आहे. आमच्या शाळेचा एक प्लॉट अडकला आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. उमेदवारीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील," असेही भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. -ठाकरे गटाकडून १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कोणत्या मतदारसंघात मिळाली संधी? - Thackeray group candidates list
  2. पुण्यातून दिला जाणार मराठा समाजाचा उमेदवार; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय - Lok Sabha Elections

ABOUT THE AUTHOR

...view details