हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं पॅन कार्डमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत सरकारनं पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाला मंजुरी देलीय. यापुढं तुम्हाला QR कोडसह नवीन पॅन कार्ड मिळणार आहे. काय आहे प्रकल्प जाणून घेऊया सविस्तर बातमीतून...
PAN 2.0 ला मंत्रिमंडळाची मंजुरी : मोदी सरकारनं पॅन 2.0 कार्डला मान्यता दिली आहे. आता जुन्या पॅन कार्डच्या जागी QR कोडसह नवीन पॅन कार्ड मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकार 2.0 पॅन नवीन कार्ड लाँच करणार असून हे पॅन अपडेट असणार आहे. PAN 2.0 प्रकल्प हा एक ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे. या प्रकल्पाचा उद्देश PAN/TAN सेवांपासून ते पॅन प्रमाणीकरण सुलभ आणि सुरक्षित करणं आहे. करदात्यांना अधिक चांगला डिजिटल अनुभव देणं हे या प्रकल्पाचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
78 कोटी पॅन कार्ड जारी : सध्या देशात फक्त जुने पॅन कार्ड वापरले जात आहे. जे 1972 पासून सतत वापरात आहे. हे पॅन कार्ड आयकर कलम 139A अंतर्गत जारी केलं जातं. जर आपण देशातील पॅन कार्डधारकांची संख्या पाहिली तर 78 कोटी पेक्षा जास्त पॅन जारी करण्यात आले आहेत. ज्यात 98 टक्के व्यक्तींचा समावेश आहे. पॅन क्रमांक हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक ओळखीचा पुरावा आहे. पॅन क्रमांकाच्या माध्यमातून आयकर विभाग कोणत्याही व्यक्तीच्या ऑनलाइन किंवा आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवतो.
QR PAN मोफत मिळेल का? : आता नवीन पॅन जुन्या पॅनपेक्षा वेगळं कसं असेल याबद्दल जाणून घेऊया. PAN 2.0 प्रोजेक्टच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या या QR कोड पॅन कार्डांमध्ये मोठा बदल होणार आहे. यामध्ये करदात्यांना नोंदणीचे अनेक फायदे मिळतील. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असल्यानं त्यासंबंधीच्या सर्व सेवा सहज मिळू शकतात. याशिवाय कार्डधारकाचा डेटा आणखी सुरक्षित होईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे करदात्यांना QR PAN मोफत दिले जाईल.
1435 कोटींचा अतिरिक्त बोजा : मोदी सरकारच्या या प्रकल्पावर 1 हजार 435 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल असा अंदाज आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पॅनकार्डधारकांना त्यांचा पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही. विद्यमान पॅन प्रणालीमध्ये सुधारणा म्हणून नवीन पॅन 2.0 दिलं केलं जाईल. नवीन कार्डमध्ये स्कॅनिंग सुविधेसाठी QR कोड असेल आणि तो पूर्णपणे ऑनलाइन असेल.
पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया :
तुमच्या जवळच्या पॅन सेवा एजन्सीला भेट द्या.
नवीन कार्ड बनवण्यासाठी अर्ज करा.
OTP पडताळणीसाठी मोबाईल नंबर द्या.
नाव, आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्या.
eKYC किंवा स्कॅन-आधारित यामधील पर्याय निवडा.
प्रत्यक्ष पॅनकार्डसाठी 107 रुपये फीस भरा.
ePAN कार्डसाठी 72 रुपये शुल्क आकारलं जाईल.
पॅन कार्ड पेमेंट केल्यानंतर eKYC प्रमाणीकरण होईल.
eKYC प्रमाणीकरणानंतर कागदपत्रं अपलोड करा.
मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि सबमिट करा.
यानंतर तुम्हाला पावती क्रमांक मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासू शकता.
हे वाचलंत का :