पुणे :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे पुणे दौऱ्यावर आहेत. बुधवारी महाविकास आघाडीनं ८५_८५_८५ जागांवर तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं असताना, आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही १०० च्या पुढे जागा लढवणार असल्याचं सांगितलं. याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांना तुम्ही फार मनावर घेऊ नका.
जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटणार :जागावाटपाबाबत नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, काही जागेवर चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे हे चद्रकांत पाटील यांना माहिती आहे. त्यांची सगळी चर्चा दिल्लीत होत आहे. आघाडी करत असताना एक एक जागेवर चर्चा करावी लागते. तसंच वाटाघाटीतूनच हे प्रश्न सुटत असतात. काही जागांवर चर्चा झाली असून थोड्या जागांचा प्रश्न हा लवकरच सुटणार आहे. बुधवारी आमच्या ८५-८५-८५ जागा झाल्या आहेत. तसंच बाकीच्या जागांवर चर्चा सुरू असून लवकरच प्रश्न सुटणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.