नागपूर : नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बंटी शेळके यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभव झाल्यानंतर आता बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत," असा थेट आरोप बंटी शेळके यांनी केला. त्यामुळं काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता काँग्रेसनं बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मी राहुल गांधींचा शिपाई : मध्य नागपूर या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. मध्य नागपूरची जागा काँग्रेसनं हरावी, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणीवपूर्वक पक्षाचे संघटन हे कमजोर करून ठेवलं होतं. मतदारसंघात मला कुठलीही मदत न केल्याचा आरोप बंटी शेळके यांनी केला. "माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. मी नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे," असं म्हणत बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
तेव्हा कुठे होते नाना पटोले :"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आरएसएसचा गणवेश जाळण्याचं काम मी केलं. त्यावेळी लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. नाना पटोले त्यावेळी माझ्याबद्दल एकही शब्द बोलले नाही. नाना पटोले तेव्हा कुठे गेले होते?," असा सवाल बंटी शेळके यांनी केला. "आरएसएसचे एजंट नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर मी आरटीओ विरोधात आंदोलन केलं. आंदोलनाला परवानगी देऊ नका, असं नाना पटोले यांनी सांगितलं. उलट माझ्यावर हल्ला झाला त्यावर ते एकही शब्द बोलले नाहीत. नाना पटोलेंची कॉंग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना असल्यामुळं ते आरएसएसचे एजंट आहेl," असं बंटी शेळके म्हणाले.