नागपूर Kunbi Maratha Caste Certificate :मराठा समाजाचं वादळ मुंबईच्या दिशेनं निघालं असून आज सहाव्या दिवशी मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुद्धा वेगवान हालचालींना सुरुवात केली आहे. दरम्यान, मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
कुणबी प्रमाणपत्र वितरित : नागपूर जिल्हात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून यापैकी कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र आहे. समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात आली आहे. या समितीद्वारे संपूर्ण राज्यामध्ये सन 1967 पूर्वीच्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधणं तसंच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं, संबंधित व्यक्तींना जात प्रमाणपत्राचं वाटप करणं याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्रं देण्यात आली आहेत. शासन निर्देशाप्रमाणं जिल्हास्तरावर नोंदी शोधण्याकामी विविध कक्ष, विविध विभाग आणि मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी यांचा वापर करुन नोंदी शोधण्याचं काम केलं आहे.
कुणबी–मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र :नागपूर जिल्ह्यामध्ये 24 ऑक्टोबरपासून कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या एकूण 3289 आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये 3 हजार 289 अर्जांपैकी कुणबी-मराठा एक अर्ज प्राप्त झाला आहे. प्राप्त अर्जानंतर तपासणी केल्यावर आत्तापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या एकूण निर्गमित प्रमाणपत्राची संख्या 3273 आहे. यापैकी 3272 फक्त कुणबी आहेत, तर एक कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रशासनामार्फत निर्गमित करण्यात आलं आहे.