मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी पूर्ण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढत राहणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतलीय. मुरलीधर मोहोळ राज ठाकरेंच्या मदतीनं पुण्यातील राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाणं आलंय.
सदिच्छा भेट राजकीय भेट नाही : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतय. निवडणुकीला सामोरे जाताना दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीकडून खबरदारी घेतली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वबळाचा नारा दिला. त्याचा फटका महायुतीला बसू नये, यासाठी महायुतीकडून त्यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचा समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भेटीनंतर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुण्यात माझ्यासाठी सभा घेतली होती. त्यांची भेट घ्यायची राहिली. आजची भेट ही सदिच्छा भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा नव्हती. पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत यावर बोलताना मोहोळ म्हणाले, की त्यांचा आणि माझ्या भेटीचा काहीही संबंध नाहीय.