मुंबई Maharashtra Ministers Bungalow : सार्वजनिक बांधकाम विभागानं मुंबईतील मंत्र्यांच्या 36 बंगल्यांच्या डागडुजीसाठी एक-दोन नाही तर तब्बल 26 कोटी रुपये खासगी कंत्राटराला वळते केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं मंत्र्यांच्या बंगल्याच्या पाणी आणि वीज बिलासाठी 52 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मुंबई प्रेसिडन्सी विभागानं खासगी कंत्राटदाराला यातील 26 कोटी रुपये वळते केल्यानं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
विभागाचं स्पेशल ऑडिट झालं पाहिजे : मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसाठी खासगी कंत्राटदाराला 26 कोटी रुपये वळते केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, "मला वाटते सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्याचं एकदा ऑडिट झालं पाहिजे. नेमकं यात चाललंय तरी काय? हे पाहिलं पाहिजे. विनाकारण अनावश्यक या खात्याकडून खर्च होताना पाहायला मिळत आहे. त्याला आम्हीसुद्धा सहमत आहोत. त्यामुळं या खात्याचं स्पेशल ऑडिट झालं पाहिजे.'' असं सत्ताधारी शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाठ यांनी मागणी करत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवरुन प्रतिक्रिया दिली आहे.