नागपूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते, विविध पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारक राज्यभर फिरत आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट नागपूरातील प्रसिद्ध रामजी-शामजी तर्री पोहे सेंटरला भेट दिली. ते अचानक हॉटेलमध्ये आल्यानं इथे आलेल्या सर्वाना आश्चर्याचा धक्काचं बसला होता.
राहुल गांधींनी बनवले पोहे : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील सभा उरकून राहुल गांधी नागपूरला पोहचले होते. त्यानंतर ते नागपूर विमानतळावरून थेट रामजी-शामजी हॉटेलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी चक्क स्वतःच्या हाताने पोहे बनवले आणि खाल्ले. त्याचबरोबर त्यांनी हॉटेल मालकांसह तिथे उपस्थित तरुणांशी गप्पा मारल्या. त्यानंतर राहुल गांधी विमानतळाच्या दिशेने रवाना झाले.
हेलिकॉप्टरची केली तपासणी : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाहीर सभेसाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे हेलिकॉप्टरने आले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीनं तैनात अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टर तपासणी संदर्भात यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला.
चिमूरच्या सभेत केली घोषणा? : महाविकास आघाडीची सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दर महिना 3 हजार जमा होणार, त्यांना मोफत एसटीचा प्रवास, गरीब वर्गाला उपचारासाठी 25 लाखांचा मोफत आरोग्य विमा, दहा लाख युवकांना नोकऱ्या आणि बेरोजगार युवकांसाठी 4 हजार मासिक भत्ता अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आजच्या चिमूर येथे आयोजित प्रचार सभेत केली.
हेलिकॉप्टरची तपासणी सुरू : निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते, विविध पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारक राज्यभर फिरत आहेत. एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात त्वरित पोहोचण्यासाठी हे नेते हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात पैशांसह कुठल्याही वस्तूंची ने-आण केली जाऊ शकते. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बॅगा तपासणी सुरू केली.
200 कंपन्यांचे मालक दलित, आदिवासी, मागास का नाही? : दलित, आदिवासी आणि मागास वर्गाला नेहमीच वंचित ठेवण्यात आलं. देशाच्या 200 कंपन्या घ्या, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला अशा सर्व कंपन्यांचा एकही मालक हा दलित, आदिवासी किंवा मागास वर्गातला नाही. एवढंच नव्हे तर या कंपन्यात उच्च पदावर बसलेला एकही अधिकारी हा या वर्गातील नाही. प्रसार माध्यमातील मोठे पत्रकार, अँकर देखील या वर्गातील नाहीत अशी असमानता या देशात आहे, असा दावाही यावेळी गांधी यांनी केला.
हेही वाचा -