भंडारा : रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत वाघीण जखमी झाली. ही घटना आज (16 नोव्हेंबर) भंडारा वन विभागाअंतर्गत नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र डोंगरी येथं घडली. अपघाताची माहिती मिळताच, भंडारा वन विभागातील वन कर्मचारी, वन अधिकारी, पोलीस व रेल्वे प्रशासन कर्मचारी तसेच वन्यप्राणी बचाव दल, भंडारा व नवेगाव - नागझिराचे यांचं पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झालं. बचावकार्य सुरू करुन वाघीणीला पुढील उपचारासाठी नागपूर येथं स्थलांतरित करण्यात आलं.
वाघीणीला गंभीर दुखापत : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या प्रमाणभूत कार्यप्रणालीनुसार माजी मानद वन्यजीव रक्षक, श्री.शाहीद खान व NTCA चे प्रतिनिधी जुडे पिचर, सदस्य, SEAT स्वयंसेवी संस्था, भंडारा व पशुधन विकास अधिकारी यांचे चमू यांची समिती गठीत करण्यात आली. समिति व वैद्यकीय सल्ल्यानुसार वाघीणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. जखमी वाघीणीची शारीरिक तपासणी व औषध उपचार डॉक्टरांच्या चमूद्वारे करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर वाघीणीला गंभीर दुखापत असल्यानं पुढील उपचारासाठी गोरेवाडा वन्यजीव चिकित्सालय, नागपूर येथं स्थलांतरित करण्यात आलं.
सदर वन्य प्राणी वाघ रेस्क्यूची कारवाई राहुल गवई, मा. उपवनसंरक्षक, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली रितेश भोंगडे, प्रकाष्ट निष्कसण अधिकारी, गडेगाव व अपेक्षा शेंडे, परिक्षेत्र वन अधिकारी, जाबकांद्री व वन कर्मचारी भंडारा वन विभाग यांनी केलं.