नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. भाजपानं काँग्रेस आघाडीवर व्होट जिहादचा आरोप केला. तर दुसरीकडे, भाजपा निवडणुकीत मुद्दाम हिंदू- मुस्लिम वाद निर्माण करीत आहे. शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर मात्र एक शब्द बोलत नाही, अशी टीका काँग्रेसनं भाजपावर केली. यावरून राजकीय वातावरण अधिकच तापलंय.
फडणवीस यांचे गंभीर आरोप : "मुस्लिम मतांसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी व्होट जिहाद करत आहेत, हे अत्यंत खेदजनक आहे," असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास घाडीवर नागपूर येथं प्रसार माध्यमांसोबत बोलताना केला. "उलेमा कौन्सिलनं महाविकास आघाडीला 17 मागण्यांचं पत्र दिलं. या मागण्या इतक्या भयानक आहेत की, धर्माच्या आधारावर मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यात करण्यात आली. याशिवाय देशात आणि राज्यात झालेल्या दंगलींमधील जे मुस्लिम आरोपी आहेत, त्यांच्यावरील केसेस परत घ्या आणि आरएसएसवर बंदी घाला, अशीही मागणी त्यात करण्यात आली," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शरद पवार व्होट जिहादचे सुपेसालार : "व्होट जिहादचे सुपेसालार शरद पवार आहेत. निवडणूक काळात मुस्लिमांचं इतकं लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.अल्पसंख्याक मतं मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल, तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावं लागेल. जे बहुसंख्य आहेत, त्यांना पुनर्विचार करावा लागेल. एक व्हावं लागेल," असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
जातीवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न : "महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं एक्स्ट्रीम पोलरायझेशन करत आहे, त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ. काँग्रेस जाती-जातीत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, ते विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे रोडमॅप नाही. ते फक्त जातीवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू , मुस्लिम वाद : "भाजपा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी निवडणुकीत मुद्दाम हिंदू, मुस्लिम वाद निर्माण करत आहे. 'बटेंगे तो कटेंगे' अशा घोषणा करत भीती निर्माण करत आहे. भाजपा स्थानिक समस्या, बेरोजगारी, शेतकरी, महागाई यावर बोलत नाही. सत्ता असताना शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही आणि आता सांगतात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु. माझा फडणवीसांना सल्ला आहे की, त्यांनी हिंदू- मुस्लिम वाद करू नये. तुम्ही भ्रष्टाचार करून पैसे कमावले आणि आता जाहिराती करून मतं मागत आहात. तुम्ही निवडून येणार नाहीत," असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
अशी खूप पत्र येतात : ज्या पत्रावरून भाजपा महाविकास आघाडीवर आरोप करत आहे, त्यावर बोलताना पटोले म्हणाले, "अशी खुप पत्र येतात, त्यातील अटी मान्य करायच्या किंवा नाही त्या आम्ही ठरवू. एखाद्या धार्मिक संघटनेनं आपल्या लोकांना आवाहन केलं की, त्याला भाजपाकडून विरोध होतो. आरएसएस ही धार्मिक संघटना आहे आणि ही संघटना निवडणुकीत प्रचार करीत आहे. त्यांचं ऐकलं नाही तर धमकी दिली जाते. यावर फडणवीस मात्र एक शब्द बोलत नाहीत."
हेही वाचा