ठाणे: घोडबंदर रोड येथील उच्चभू वस्ती असलेल्या ठिकाणी सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशी नागरिकाला हिरानंदानी इस्टेट येथून रविवारी पहाटे अटक केली. ठाणे पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी बांगलादेशी आरोपीला अटक केली. ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असल्यानं ते बांगलादेशी नागरिकांचा अड्डा झाला आहे. ठाणे पोलिसांनी आता बांगलादेशी नागरिकांना शोधून काढण्याची मोहिम हाती घेतली आहे.
बांगलादेशाच्या विरोधात मोठी मोहीम :ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट भागात लेबर कॅम्प जवळ मिळालेल्या आरोपीने या परिसरात दहशत निर्माण केली आहे. या भागात करोडो रुपये किंमतीची घरे आहेत. या ठिकाणी अनेक इमारतींच्या बांधकामाचं काम सुरू आहे. सोबत मेट्रोचं देखील कास्टिंग यार्ड आहे. यासाठी लागणारा मोठा कामगार वर्ग या भागात राहतो. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी या भागातून मिळाल्यानंतर आता या सर्व परिसरात ठाणे आणि मुंबई पोलिसांनी मोठी शोध मोहीम घेतली आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली. हा आरोपी या भागातून मिळाल्यानंतर ठाणे पोलीस देखील चांगलेच कामाला लागले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात आता बांगलादेशी विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे.
बांगलादेशी घुसखोरांकडं भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेज : ठाणे स्टेशन ते गायमुख आणि शिळफाटा आणि पुढेही मोठ्या प्रमाणात गृहसंकुले आणि नागरिकांची संख्या वाढत आहे. या बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरविणारे ठेकेदारांना बांगलादेशी नागरिक हे स्वस्तात मिळतात. त्यामुळं बहुतांश बांगलादेशींचा अड्डा हा बांधकामाची ठिकाणे झाला आहे. ठाणे पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याची मोहीम सुरु केली आहे.