नागपूर Sanjay Raut : 'नागपूर'मुळंच आम्हाला दोघांना (अनिल देशमुख) तुरुंगात जावं लागलं, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. "आम्ही ज्या अवस्थेत आणि परिस्थितीत तुरुंगात दिवस काढले ते फक्त नागपूरमुळंच," असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली. "भाजपा निवडणुका घ्यायला का घाबरतं?" असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.
खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया (Source : ETV Bharat Reporter) एकमेकांचे पाय ओढायचे नाही : "नागपूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोण किती जागा लढणार यावर चर्चा झाली. तसंच विदर्भात ५० ते ५५ जागा महाविकास आघाडी जिंकतील असं वातावरण दिसत आहे. जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाही हे आमचं धोरण आहे. २० आणि २१ तारखेला जागा वाटपाबाबतच्या बैठकांना सुरुवात होणार आहे," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
मुख्यमंत्रिपदाबाबत भूमिका मवाळ? :"क्रूर राजकाणाला गाडत नाही तोपर्यंत 'आम्हाला तुरुंगात टाकलं' हा प्रचाराचा मुद्दा राहील. आम्ही भूमिका घेतली म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं. आणीबाणीतंही असं झालं नाही. आणीबाणीचा काळा दिवस भाजपावाले सांगतात. मग आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता का?" असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला. उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेनुसार मुख्यमंत्रिपदाचा जो चेहरा निवडला जाईल, त्याला आम्ही पाठिंबा देणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत, असं राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी भूमिका मवाळ केल्याचं दिसून आलं.
लाडकी बहीण योजनेवरुन टीका : संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्नाचं उत्तर देताना महायुती सरकारवर टीका केली. "लाडक्या बहिणीला १५०० रुपयांसह धमकीचा बोनस दिला जातोय," असं संजय राऊत म्हणाले. "चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाही. कारण भाजपाला झारखंडमध्ये गोंधळ (राजकीय) करायचा आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'वन नेशन वन इलेक्शन'च्या गप्पा पंतप्रधान मोदी मारत आहेत, परंतु चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नाहीत," अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा -
- आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देऊ - संजय राऊत - Sanjay Raut
- अजित पवार हे घरातच कुस्ती खेळणार; संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut