मुंबई Sanjay Raut On Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना, विरोधकांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात राहण्याचा निर्धार केलाय, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. आपल्या भाषणात त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासह राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींचं नाव न घेता मोदी म्हणाले की, तेच उत्पादन पुन्हा पुन्हा बाजारात आणण्यासाठी काँग्रेस मागील काही वर्ष प्रयत्न करतंय. आता काँग्रेसच्या त्या दुकानाला टाळं ठोकायची वेळ आलीय. यावर खासदार संजय राऊत यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतलाय.
पंतप्रधान मोदींना लगावला टोला : "सभागृहात पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणि देशाच्या धोरणावर बोलायचं असतं. पण, आपल्या पंतप्रधानांनी त्यावर एक चकार शब्द देखील काढला नाही. ही सगळी प्रचारकी भाषणं होती. देशाच्या प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केला नाही. लडाख, दिल्ली, जम्मू-काश्मीर यावर ते काहीही बोलले नाहीत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर काय बोलले ते? त्यांच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका होती. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा," असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय.
मुख्यमंत्र्यांच्या राज्यात गुंडा राज्य : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात गुंडागिरीचा अड्डा सुरू झालाय. पंतप्रधान मोदींनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांचं राज्य हे गुंडा राज्य झालंय. महाराष्ट्रात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिंदे यांचं सरकार आल्यावर राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर पंतप्रधान बोलले नाहीत. देश हुकुमशाहीकडं चाललाय आणि हे चंदीगढ निवडणूक पाहिल्यावर समजेल."