पुणे:-काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील आदिवासी समाजातील आमदारांकडून मंत्रालयातील जाळीवर उड्या मारून आंदोलन करण्यात आलं होतं. आता या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. राज्यात आज चाललेला खेळ आणि सर्कस पाहिली तर असं वाटतं की, आज कित्येक नेत्यांना राज्याच्या राजकारणात जाळ्यांशिवाय असलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावलं पाहिजे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता नरहरी झिरवाळ यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बोलत होते.
साहित्यिकांच्या समोर आपण काय बोलणार :राज ठाकरे म्हणाले की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण करणार आहे. साहित्यिकांच्या समोर आपण काय बोलणार आहोत. आम्हाला बोलण्यासाठी जी भाषा दिली जाते किंवा वाचायला दिली जाते, त्यांच्या समोर बोलायचं नसतं, तर ऐकायचं असतं. मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी जी मदत लागणार आहे, त्यासाठी आम्ही आहोतच आणि हे मी माझ्याकडून नक्कीच सांगू शकतो. आम्हाला अशा या साहित्य संमेलनात बोलायला नव्हे, तर ऐकायला बोलावलंय. मी गेले अनेक वर्ष राज्यातील साहित्यिकांना पाहत आलोय. तो मराठी बाणा प्रत्येकाच्या मनात, अंगात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगण्याची धमक आणि हिंमत काही वर्षांपूर्वी होती, ती आज मला कमी दिसत आहे, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
आम्ही बोललो तर ट्रोल होऊ : ते पुढे म्हणाले की, आज ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणात भाषा बघायला मिळत आहे ते पाहता त्यांचे कान धरून त्यांना जमिनीवर आणून शिकवणे, समजावून सांगणे हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आणि हे तुम्हीच सांगू शकता. आम्ही बोललो तर ट्रोल होऊ, याचा विचार तुम्ही करू नका, मी आजपर्यंत जे काही बोललो, त्याबाबत सोशल मीडियावर काय बोललं गेलं हे मी कधीच वाचलं नाही आणि बघितलंसुद्धा नाही. मी अशा भानगडीत पडतही नाही. आपण नेहमी म्हणत असतो की, महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. आज याच महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खाली गेलीय आणि यांना कोणीही समजावणारे नाहीये. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी गेलेत. आता ही जबाबदारी साहित्यिकांनी हातात घेतली पाहिजे. भाषा चळवळ साहित्यिकांनी पुढे नेली पाहिजे आणि ही आजची जबाबदारी असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
'त्यांना' जाळ्यांशिवाय असलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावलं पाहिजे; राज ठाकरे कडाडले - MNS CHIEF RAJ THACKERAY
राजकारण्यांचा आज चाललेला खेळ आणि सर्कस पाहिल्यास कित्येक नेत्यांना राज्याच्या राजकारणात जाळ्यांशिवाय असलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावलं पाहिजे, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.
राज ठाकरे (ETV Bharat File Photo)
Published : Oct 7, 2024, 5:31 PM IST
|Updated : Oct 7, 2024, 5:37 PM IST
Last Updated : Oct 7, 2024, 5:37 PM IST