मुंबई Raj Thackeray : मुंबईत आज पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. मुंबईकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं जातो? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सर्वच पक्ष तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज ठाकरे यांनी ''मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण-तरुणी मतदान करतील. फक्त पाच वाजेपर्यंत वाट बघा,'' अशी प्रतिक्रिया दिलीय.
चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा : मागील चार टप्प्यांमध्ये संपूर्ण देशभरातच मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या सगळ्यात मुंबईच्या मतदाराकडं सर्वांच्या नजरा असतात. आता पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान होत असताना मुंबईत मतदानाचा टक्का वाढेल अशी सर्वांनाच आशा आहे. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, "उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झालीय. इथं जी काही गर्दी दिसते त्यावरुन एकंदरीतच चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं आपण पाच वाजेपर्यंत वाट बघू, त्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल."